अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा विजयी झाले आहेत. राष्ट्राध्यक्षपदासाठी आवश्यक असलेली ५३८ पैकी २७० इलेक्टोरल मतं मिळवण्यात ते थोड्याच वेळापूर्वी यशस्वी ठरले. J D वान्स हे त्यांच्या पक्षाचे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. फॉक्स न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांना २७७ तर डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना २२६ इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. अजून ३५ मतांची मोजणी शिल्लक आहे. एकूण ३१५ मतं मिळवू असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.
तीन वेळा निवडणूक लढवून २ वेळा जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा झाला आहे. यापूर्वी २०१६ ते २०२० मध्ये ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यानंतर २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत ज्यो बायडेन यांनी त्यांना पराभूत केलं होतं.
अमेरिकेचं सुवर्णयुग आता सुरू झालं असून पुन्हा अमेरिकेला महान करण्यासाठी हा विजय झाल्याचं ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित करताना सांगितलं. असा विजय यापूर्वी कधीही झालेला नव्हता. हा अमेरिकी नागरिकांचा विजय आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी लढत राहणार असल्याचं ते म्हणाले.