अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज शपथ घेणार आहेत. ते वॉशिंग्टन डीसी इथं अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती पदाची शपथ घेतील. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री साडेआठ वाजता शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. सत्तेच्या अधिकृत हस्तांतरणाचा भाग म्हणून ट्रम्प उद्घाटन भाषण देखील करतील. जेडी व्हॅन्स अमेरिकेचे उपाध्यक्ष म्हणून शपथ घेतील. शपथविधी सोहळ्याला अनेक परदेशी नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले, इटलीचे प्रधानमंत्री ज्योर्जिया मेलोनी, इक्वाडोरचे अध्यक्ष डॅनियल नोबोआ, एल साल्वाडोरचे अध्यक्ष नायब बुकेले, ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो आणि पोलंडचे माजी प्रधानमंत्री मातेउझ मोराविएक यांचा समावेश आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर भारताचं प्रतिनिधित्व करतील. पाहुण्यांमध्ये टेस्लाचे एलोन मस्क, ॲमेझॉनचे जेफ बेझोस, मेटाचे मार्क झुकरबर्ग, ऍपलचे टिम कुक आणि ओपनएआयचे सॅम ऑल्टमन यांचाही समावेश असेल. शपथ घेण्यापूर्वी, ट्रम्प यांनी काल रात्री वॉशिंग्टन डीसी इथं विजयी रॅलीत समर्थकांना संबोधित केलं.
Site Admin | January 20, 2025 1:05 PM | Donald Trump | President Trump