‘ब्रिक्स’ देशांनी डॉलरची स्पर्धा करणारं चलन सुरु केलं, तर या राष्ट्र समूहाचं अस्तित्व नष्ट होईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी दिला आहे. तसंच ‘ब्रिक्स’ समूहातला एखादा देश ही योजना घेऊन पुढे गेला, तर अमेरिका त्या देशावर १०० टक्के आयात शुल्क आकारेल, असं त्यांनी म्हटलं आहे. जगातल्या इतर देशांनी आकारलेल्या आयात शुल्काशी जुळणाऱ्या दरांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देणाऱ्या ठरावावर नुकतीच ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर ते बोलत होते.
ब्रिक्स समूहाच्या सदस्य देशांना सामायिक चलनाच्या मुद्यावर चर्चा करण्यात स्वारस्य नसून, ब्रिक्सचा संस्थापक सदस्य असलेल्या भारतानं यापूर्वीच ही कल्पना नाकारल्याचा दावा ट्रम्प यांनी यावेळी केला.
‘ब्रिक्स’ राष्ट्र समूहात सुरुवातीपासून ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश होता. अलीकडेच त्यामध्ये इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि UAE, या देशांचा समावेश करण्यात आला, तर अल्जेरिया, नायजेरिया आणि तुर्की, यासारख्या इतर अनेक देशांना ‘भागीदार देश’ असा दर्जा आहे. आकार आणि प्रभाव व्यापक असूनही, ‘ब्रिक्स’ हा मुक्त व्यापार गट नाही.