स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेडमधल्या विष्णुपुरी इथल्या सहयोगी सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ या अंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचं आज थाटामाटात उद्घाटन झालं. या महोत्सवात भारतीय संविधान तसंच नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यांसह मराठवाड्यातील कला संस्कृतीचे महत्व अधोरेखित करण्यात येणार आहे.
हा महोत्सव म्हणजे युवकांना कला कौशल्याच्या संधी बहाल करणारं अधिष्ठान ठरणार असल्याचं कुलगुरू डॉ. मनोहर चासकर या उदघाटन प्रसंगी म्हणाले. मराठवाडा ही संतांची, समतेची, अध्यात्माची भूमी असून मराठवाड्याला धार्मिक सांस्कृतिक साहित्याचा मोठा वारसा लाभलेला आहे. स्पर्धेतलं यश-अपयश पचवण्याची तयारी ठेवावी लागते. जीवन यशस्वी करायचे असेल तर स्वतःला स्वीकारण्याची तयारी ठेवा, असं कॉमेडीची बुलेट ट्रेन तसंच मराठवाड्याची मानसकन्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिनेकलावंत प्राजक्ता हनमघर यावेळी युवकांना संबोधित करताना म्हणाल्या.