डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विरोधकांच्या अपप्रचारामुळे भाजपाच्या जागा घटल्या, पण जनाधार घटला नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं मत

लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी अपप्रचार केल्यानं भाजपाच्या जागा कमी आल्या, पण आपला जनाधार कमी झालेला नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज अकोल्यात भाजपाच्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. 

कुठल्याच बहिणीला लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार नाही. मात्र या  योजनेच्या यशाचा त्रास महाविकास आघाडीला होत आहे ते रोज लाडक्या बहिणीच्या संदर्भात खोटं बोलत आहेत असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपल्या सरकारनं घेतला आहे त्यासाठी आपल्या सरकारनं सौर प्रकल्पामधून १२हजार मेगावॅट वीजनिर्मितीची तयारी केली आहे. पुढची पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बील येणार नाही असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले. १ कोटी २० लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे देण्याची सुरुवात आपण केली आहे शेतकऱ्यांचा विचार करणारं  हे सरकार आहे असंही ते म्हणाले.

विदर्भाचा दुष्काळ कायमचा संपवणाऱ्या पेनगंगा प्रकल्पालाही सरकारनं मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे १० लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून विदर्भाचा दुष्काळ संपणार आहे. यामुळे विदर्भातल्या पुढच्या पिढीला कोरडवाहू शेती काय असते हे माहित पडणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था युतीसरकार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.