सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत धाराशिव जिल्ह्याला सहा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. जागतिक आरोग्य दिनी म्हणजे येत्या 7 एप्रिल रोजी मुंबईत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
प्रजनन आणि बाल आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत पाच वर्षात सातत्याने बालमृत्यू कमी करणारा जिल्हा म्हणून धाराशिव जिल्ह्याला राज्यस्तरीय प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कामाच्या वार्षिक मूल्यांकनात धाराशिव जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी तर राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात उत्तम कामगिरी करणारा जिल्हा या श्रेणीत धाराशिव जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी राहिला आहे. गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यात दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय पातळीवरील मूल्यांकन प्राप्त केल्याबद्दल द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे तर राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत मोतीबिंद शस्त्रक्रिया मध्ये उद्दिष्टाच्या 94% काम करून धाराशिव जिल्हा राज्यात द्वितीय स्थानी राहिला आहे. सर्वाधिक रुग्णालयीन प्रसूती करणाऱ्या शासकीय रुग्णालयामध्ये धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील सास्तुर इथल्या ग्रामीण आरोग्य रुग्णालयास राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे. देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर धाराशिव.
Site Admin | April 5, 2025 8:37 AM | धाराशिव | पुरस्कार | सार्वजनिक आरोग्य विभाग
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत धाराशिव जिल्ह्याला सहा राज्यस्तरीय पुरस्कार
