राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला. नैतिकतेला धरुन आणि तब्येत ठीक नसल्यानं राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढच्या कार्यवाहीसाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवला आहे असं फडनवीस यांनी विधानभवन परिसरात बातमीदारांशी बोलताना सांगितलं. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तो स्वीकारला आहे. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले आरोपी मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
धनंजय मुंडे यांनी या आधीच राजीनामा द्यायला हवा होता. त्यांनी शपथ घ्यायलाच नको होती अशी प्रतिक्रिया पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केली.