६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज राज्यात साजरा होत आहे. १९५६ साली विजयादशमीच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती.
नागपूर इथं आज भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत सामूहिक बुद्धवंदना झाली. यावेळी समता सैनिक दलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा सुरु झाला असून उत्तरप्रदेशच्या कुशीनगर इथले भिक्षु संघाचे अध्यक्ष भदंत ए.ए.बी.ज्ञानेश्वर आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते आकाश लामा मुख्य अतिथी म्हणून उपस्थित आहेत. कामठी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयातही धम्मचक्रपरिवर्तन दिन साजरा झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मंत्री सुलेखा कुंभारे, आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यक्रमाला उपस्थित होते.
६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज मुंबईत चैत्यभूमी आणि टिळकनगर सर्वोदय महाबुद्ध विहार इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. भारतीय बौद्ध महासभा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पगुच्छ अर्पण करून बुद्धवंदना म्हणण्यात आली. त्यानंतर पंचशील ध्वजारोहण करून समता सैनिक दलाने बाबासाहेबांना मानवंदना दिली. यावेळी आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचं सामूहिक वाचनही केलं. वाशिम इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बौद्ध बांधवांनी बौद्ध वंदना केली 22 प्रतिज्ञांचे वाचन केले.
राज्यात इतरत्रही हा दिवस पारंपरिक श्रद्धेनं साजरा झाला. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज नांदेड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर महाबुद्धवंदनेचा कार्यक्रम झाला. यावेळी भिक्खू संघासह हजारो उपासक उपस्थित होते.