राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडनवीस यांनी आज शपथ घेतली. मुंबईत आझाद मैदानात झालेल्या समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी फडनवीस यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, शिवराजसिंह चौहान, जेपी नड्डा, रामदास आठवले, जयशंकर, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि नेते यावेळी उपस्थित होते. तसंच उद्योग, क्रीडा, चित्रपटसृष्टीसह इतर क्षेत्रातले मान्यवरही उपस्थित होते.
शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानाचा परिसर सुशोभित करण्यात आला होता. मुख्य कार्यक्रमाच्या आधी संगीतकार अजय अतुल यांच्यासह इतर कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातून भाजपाचे नेते आणि पदाधिकारी तसंच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मंत्रालयात प्रवेश केला. मंत्रालयाच्या प्रांगणातल्या राजमाता जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना, तसंच संविधान उद्देशिकेला त्यांनी अभिवादन केलं.