सामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन सुकर व्हावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज राज्यातल्या सर्व अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला. त्यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या शंभर दिवसांत प्राधान्यानं करायच्या कामांबाबत सविस्तर सूचना प्रशासनाला दिल्या. त्यावरच्या कार्यवाहीचा आढावा येत्या १५ एप्रिलला घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
विभाग, कार्यालयाचं संकेतस्थळ अद्ययावत करा, ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करा, शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहिम राबवा, नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणं निकाली काढा, उद्योजकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, शासनाच्या महत्वाच्या प्रकल्प आणि योजनांच्या प्रकल्पांना भेटी द्या, शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते.