छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात ‘घाटी’ च्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येईल, असं आश्वासन, उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांनी दिलं. जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आढावा घेतनाा ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत, जिल्ह्याचा २०२५-२६ या वर्षाचा आराखडा हा १२०० कोटी रुपयांचा तयार करण्यात आला असून, प्राप्त निधीचा विनियोग गुणवत्तापूर्ण कामांसाठी करावा, असे निर्देश पवार यांनी दिले.
केंद्र आणि राज्य शासनाच्या अक्षय ऊर्जा निर्मितीसंदर्भात सर्व जिल्ह्यांनी सकारात्मकतेनं काम करावं आणि जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यामध्ये शाळा, कार्यालयांच्या सौर ऊर्जेसंदर्भात प्रस्तावाचा समावेश करावा, अशी सूचना पवार यांनी यावेळी सगळ्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना केली.
लातूर शहरातल्या गंजगोलाई या ऐतिहासिक वैभवाच्या ठिकाणाला जोडणारे रस्ते आणि परिसराच्या सुशोभिकरणाला निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अधिकाऱ्यांनी या कामाचा सविस्तर आराखडा सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. जिल्ह्यात येऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक पाहता येत्या पाच वर्षात शहराची लोकसंख्या वाढणार असून, त्यादृष्टीनं निर्माण करण्याच्या पायाभूत सुविधा आणि अन्य आवश्यकतांसाठी वाढीव नियोजन करण्यात आलं असल्याचं, तसंच जिल्ह्यातली ५० टक्के लोकसंख्या शहरी भागात राहत असल्याचं सांगत, पालकमंत्री शिरसाट यांनी नागरी सुविधा विकासासाठी वाढीव निधी मिळावा, अशी मागणी केली.
Site Admin | February 6, 2025 11:23 AM | अजित पवार | घाटी रुग्णालय
घाटी रुग्णालयाच्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन
