मुंबई-नाशिक महामार्गावरची वाहतूक येत्या १० दिवसांत सुरळित झाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. ते आज मंत्रालयात या महामार्गाच्या सुधारणेबाबत आयोजित बैठकीत बोलत होते.
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. त्यावर सध्या काही ठिकाणी उड्डाणपुलांची कामं सुरु आहेत. त्यातच पावसामुळे महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास होत असून प्रवासाचा वेळही ८ ते १० तासांवर पोहोचला आहे. त्यामुळे या महामार्गाची दुरुस्ती युद्धपातळीवर करणं आवश्यक आहे. महामार्गावरचे खड्डे बुजवले जात नाहीत, महामार्गाची डागडुजी होत नाही तोपर्यंत मुंबई-नाशिक महामार्गावरची टोल वसुली थांबवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अजित पवार यांनी यावेळी दिले.
अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची पाहणी करून एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करावा, महामार्गावर कार्यक्षम वाहूतक व्यवस्थेसाठी नियमितपणे ड्रोनद्वारे रहदारीची पाहणी करावी, मूळ रस्त्याच्या उंचीच्या प्रमाणात काँक्रिटीकरणाचे पर्यायी रस्ते उपलब्ध करुन दिल्याशिवाय नवीन कामांना परवानगी देऊ नये, असे निर्देशही त्यांनी दिले.