इस्रायलमधे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासशी युद्धविरामाबाबत चर्चा करावी आणि गाझामध्ये ठेवलेल्या ओलीसांची सुटका करावी, ही मागणी जोर धरत आहे.
हमासने ओलीस ठेवलेल्यांपैकी सहा जणांचे मृतदेह सापडल्याचं इस्रायलच्या संरक्षण दलांनी जाहीर केल्यानंतर काल या मागणीसाठी देशभरात निदर्शनं सुरू झाली आणि रात्रभर सुरू राहिली. या मागणीच्या समर्थनार्थ देशभरातल्या विविध आस्थापना बंद राहिल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. कामगार संघटनांनीही आज एक दिवसाचा देशव्यापी बंद पुकारला आहे.