अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या योजनेबद्दल डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेली राज्यं आणि नागरी हक्क गटांच्या युतीनं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला आहे. कोलंबिया आणि सॅन फ्रान्सिस्को शहरासह २२ डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्यांनी बोस्टन आणि सिएटल इथल्या संघीय न्यायालयांमध्ये हे खटले दाखल केले.
ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच अमेरिकेतील स्थलांतराला नियंत्रित करण्याच्या उद्देशानं एकगठ्ठा कार्यकारी आदेश जारी केले. अध्यक्षांनी आपल्या अधिकारांचं उल्लंघन केलं आहे आणि अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेल्या कोणालाही आपोआप नागरिकत्व देण्याची पद्धत रद्द करण्याचा प्रयत्न करून अमेरिकन संविधानाचं उल्लंघन केल्याचा आरोप या खटल्यांमध्ये करण्यात आला आहे.