साखर कारखान्यांकडून घेतल्या जाणाऱ्या घाऊक साखरेच्या, किमान विक्री दरात ३१ वरून ४१ रुपये प्रतिकिलो पर्यंत वाढ करण्याची मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं केंद्र सरकारकडे केली आहे. महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. साखर उद्योगासंदर्भात महासंघाच्या बैठकीनंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गेल्या काही वर्षांपासून उसाच्या एफआरपीमध्ये सातत्यानं वाढ केली जात आहे; मात्र त्या तुलनेत साखरेची किमान विक्री किंमत कायम आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचं आणि पर्यायानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचंही नुकसान होत आहे, असं पाटील म्हणाले. साखर उद्योगाच्या वाटचालीशी संबंधित आगामी 10 वर्षांचा व्यापक आराखडा तयार करण्याचं काम महासंघ सध्या करत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.