दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० जागांसाठी ६ हजार ९९ उमेदवार रिंगणात आहेत. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे २३ उमेदवार असून पटेल नगर आणि कस्तुरबा नगर मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच प्रत्येकी पाच उमेदवार रिंगणात आहेत. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ हजार ५२२ अर्जांपैकी ४८७ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. पुढच्या महिन्याच्या ५ तारखेला मतदान होणार असून ८ तारखेला मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, या निवडणुकीसाठी भाजपाच्या संकल्प पत्राचा दुसरा भाग भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी आज जाहीर केला. या संकल्पपत्रात दिल्लीतल्या तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी १५ हजार रुपयांची मदत, तसंच दोन वेळचा प्रवास आणि अर्ज शुल्काची परतफेड, गरजू विद्यार्थ्यांना शिशुवर्गापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचं मोफत शिक्षण, तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमातल्या अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन, त्याशिवाय १० लाखांचा आयुर्विमा, अपघात विमा आणि रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी ५ लाख रुपयांचा वाहन विमा इत्यादी आश्वासनं संकल्प पत्रात देण्यात आली आहेत.