दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. दिल्ली विधानसभेत भाजपला 48 तर आम आदमी पक्षाला 22 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस सलग तिसऱ्यांदा ‘शून्या’ वर आल्याचं दिसून आलं आहे. भाजपला 27 वर्षांनी दिल्लीची सत्ता मिळाली आहे.
भाजपाचे परवेश वर्मा नवी दिल्लीतून, जंगपुरातून तरविंदर सिंग, करवाल नगरातून कपिल मिश्रा, राजौरी गार्डनमधून मनजिंदर सिंग सिरसा, गांधीनगरमधून अरविंदर सिंग लव्हली, ग्रेटर कैलाशमधून शिखा रॉय आणि मोती नगरातून हरिश खुराना विजयी झाले आहेत.
नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल, जंगपुरातून मनीष सिसोदिया आणि ग्रेटर कैलाशमधून सौरभ भारद्वाज हे आपचे ज्येष्ठ नेते तर पूर्व दिल्लीतून काँग्रेसचे संदीप दीक्षित पराभूत झाले आहेत. कालकाजी मतदारसंघातून आपच्या आतिशी मारलेना विजयी झाल्या आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या 48 जागांच्या यशातून एन डी ए सरकारच्या विकास आणि सुशासनाची हमी दिसून येते, खोट्या आश्वासनांनी जनतेची दिशाभूल करता येत नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तम प्रशासन आणि विकासामुळे भाजपा विजयी झाला असून जनशक्ती सर्वश्रेष्ठ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. दिल्लीकरांच्या प्रेमाची परतफेड विकासरूपानं करू, असं आश्वासनही मोदी यांनी यावेळी दिलं.
प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला जनतेची सेवा करणारं सरकार मिळाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. दिल्लीच्या जनतेनं भाजपावर विश्वास ठेवल्याचं सिद्ध झालं असून मोदी यांच्या नेतृत्वात दिल्लीचा संपूर्ण कायापालट होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
दिल्लीकरांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला असून अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाडला आहे असं सांगताना भाजपा लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल असं महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पराभव मान्य करत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीतील जनादेश नम्रतेने स्वीकारत असल्याचं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे तर काँग्रेस आत्मपरीक्षण करेल असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे चंद्रभानू पासवान विजयी झाले आहेत. त्यांनी समाजवादी पक्षाचे अजित प्रसाद यांचा 61700 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. तामिळनाडूतील इरोड पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत द्रमुकचे चंदीराकुमार व्ही सी विजयी झाले आहेत.