‘खरी शिवसेना कोणती ते राज्यातल्या जनतेने विधानसभा निवडणुकीत दाखवून दिलं,’ असं प्रतिपादन शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरीत केलं. विधानसभा निवडणुकीतल्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरीत आयोजित आभार सभेत ते बोलत होते.
‘कोकणाचा कॅलिफोर्निया नाही, तर कॅलिफोर्नियाला कोकणासारखं व्हावंसं वाटलं पाहिजे, असं काम आपल्याला करायचं आहे,’ असं प्रतिपादन शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरीत केलं. विधानसभा निवडणुकीतल्या विजयामध्ये कोकणी माणसाचा वाटा मोठा असून जनतेनं एवढं बहुमत दिल्यामुळे जबाबदारी वाढली आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. मतदारांनी पक्षाच्या नेत्यांना आमदारपदी निवडून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची आभार सभा चंपक मैदानात आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री आणि शिवसेना उपनेते उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार नीलेश राणे, ज्येष्ठ नेते रामदास कदम, माजी आमदार राजन साळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसंच जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचा भगवा ध्वज फडकेल, असा विश्वास या वेळी उदय सामंत यांनी व्यक्त केला.
लाडकी बहीण योजनेसह सरकारनं सुरू केलेली कोणतीही योजना बंद पडणार नाही, अशी ग्वाहीदेखील सामंत यांनी दिली. या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, अशी माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे.