जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं सदेह वैकुंठ गमन अर्थात तुकाराम बीज सोहळा आज पुणे जिल्ह्यात श्रीक्षेत्र देहू इथं साजरा होत आहे. यंदाचा हा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी बीज सोहळा आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले असून प्रशासनानं चोख बंदोबस्त केला आहे. देहू मध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
संत तुकाराम महाराज देहू संस्थानाच्यावतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवा- सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची आणि- निर्मल वारी, हरित वारी संकल्पनेत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला आहे. तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपूर्वी मराठी भाषेत तत्त्वज्ञान सांगितलं, असं नमूद करत, तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वरांनी धर्माबरोबरच लोकशिक्षण आणि प्रबोधनाचं मोठं कार्य केलं, असं मनोगत शिंदे यांनी पुरस्कार स्वीकरताना व्यक्त केलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथंही संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाथांचा रांजण भरायला आज सुरुवात झाली आहे. येत्या गुरुवारी २० तारखेला नाथषष्ठीचा मुख्य सोहळा होणार आहे.