आपल्या वर्तनातून मराठीचा अभिमान जागवणं, हीच खऱ्या अर्थानं माय मराठीची सेवा आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासात अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा काल मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडीया इथं पार पडला. त्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित होते.
राज्य सरकार मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कटीबद्ध असून, त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
२०२४ या वर्षाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत रावसाहेब बोराडे यांना जाहीर करण्यात आला होता. नुकतंच त्यांच निधन झाल्यामुळे त्यांच्या कन्येनं या कार्यक्रमात हा पुरस्कार स्वीकारला. नामवंत प्रकाशन संस्थेसाठीचा श्री. पु. भागवत पुरस्कार पुण्यातल्या ज्योत्स्ना प्रकाशन संस्थेला, डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ.रमेश सुर्यवंशी यांना तर मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार भीमाबाई जोंधळे यांना प्रदान करण्यात आला.