संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत पार पाडायचं आवाहन रिजिजू यांनी विरोधी पक्षांना केलं.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. ३० विविध राजकीय पक्षांचे ४२ नेते या बैठकीला उपस्थित होते. यावेळी आलेल्या सर्व सूचनांचा कामकाज सल्लागार समितीमधे विचार केला जाईल, असं रिजीजू यांनी सांगितलं.
एका उद्योजकाचं कथित लाच प्रकरण, मणिपूरमधली स्थीती, बेरोजगारी, उत्तर भारतातलं प्रदुषण इत्यादी विषयांवर चर्चेची मागणी काँग्रेसने केली असल्याचं या बैठकीला उपस्थित असलेले काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी सांगितलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही सदस्यांना सभागृहात संसदीय शिष्टाचाराचं पालन करायचं आवाहन केलं आहे.
हे अधिवेशन उद्यापासून २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. मात्र, २६ नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त कामकाज होणार नाही.