राज्यात परतीच्या पावसानं जोर धरला असून अनेक जिल्ह्यात पिकांचं नुकसान झालं आहे.
अमरावती जिल्ह्यात कालपासून झालेल्या पावसामुळे शेतात असलेल्या सोयाबिनला त्याचा फटका बसला आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन घरी आणलं असलं तरी शेतात पडून असलेलं सोयाबीन खराब होण्याची भीती आहे. काही ठिकाणी तुरीला आलेल्या फुलोऱ्याला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.
काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यात निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. याच्या १० दरवाज्यातून १६ हजार ७०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असून प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रत्नागिरीत काल घेतलेल्या विश्रांती नंतर आज दुपारनंतर पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली.
भंडारा जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचलं असून कापून ठेवलेल्या धान पिकाचं नुकसान झालं.
नांदेड जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टीची नोंद झाली. आज सकाळी अप्पर मानार धारणाचे ५ तर विष्णुपुरी प्रकल्पाचा १ दरवाजा उघडला आहे. यंदा १०६ पूर्णांक ९३ टक्के पावसाची नोंद झाली असून पावसानं सरसरी ओलांडल्याचं वृत्त आहे.