डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पावसामुळे राज्यात जनजीवन विस्कळीत

राज्याच्या विविध भागांमध्ये आज पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं. पुण्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग केल्यामुळे पुणे शहराच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. सिंहगड रस्त्यावर एकता नगरमध्ये NDRF आणि लष्कराच्या जवानांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीची पाहणी केली. दहावी आणि बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांना पावसामुळे फेरपरीक्षेला उपस्थित राहता आलं नाही, त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल, असं त्यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. दुपारी १५ हजार क्युसेकपर्यंत कमी केलेला खडकवासल्याचा विसर्ग संध्याकाळी ६ वाजेपासून पुन्हा ४० हजार क्यूसेक केल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

 

 

पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पावसामुळे ४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. मुंबई ते पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्सप्रेस आणि प्रगती एक्सप्रेस या गाड्यांच्या फेऱ्या रेल्वेनं आज आणि उद्यासाठी रद्द केल्या. 

 

 

राज्याच्या इतरही भागात झालेल्या पावसानं मुंबई, पनवेल, पालघर, कल्याण-डोंबिवली या महानगरपालिका क्षेत्रातल्या आणि ठाणे, पुणे तसंच रायगड या जिल्ह्यांतल्या शाळांना आज सुट्टी जाहीर झाली होती. ठाणे शहर आणि सातारा जिल्ह्यातल्या शाळांना आज आणि उद्यासाठी सुट्टी जाहीर झाली आहे.

 

 

मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं. पाणी साचल्यानं रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला.

 

 

ठाणे जिल्ह्यात उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून, अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. 

 

रायगड जिल्ह्यातल्या सावित्री आणि अंबा या नद्यांनी धोक्याची पातळी तर कुंडलिका आणि पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी पात्राजवळच्या गावांमधल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे.

 

सांगली जिल्ह्यात वारणा आणि कृष्णा या नद्यांचे पाणी नागरी वस्तीत आल्यामुळे ४० कुटुंबांच स्थलांतर करण्यात आलं आहे. चंद्रपूर,

 

गडचिरोलीमध्ये वाहतुकीचे अनेक मार्ग बंद झाले आहेत. हवामान विभागानं मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड आणि सातारा या जिल्ह्यांसाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी आणि साताऱ्यात उद्याही रेड अलर्ट आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा