जनतेला विश्वासात घेऊन आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधूनच राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची पुढची प्रक्रिया केली जाईल,अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दादा भुसे यांनी आज विधानपरिषदेत दिली. या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं सांगत हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी काँग्रेसचे सतेज पाटील यांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती. त्याला भुसे यांनी उत्तर दिलं.
शहरं विद्रुप करणाऱ्या बेकायदेशीर जाहिरात फलकांना चाप लावण्यासाठी आवश्यकता भासल्यास कायद्यात बदल केला जाईल, त्यासाठी समिती नेमण्याची देखील सरकारची तयारी आहे,असं या विभागाचे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. मुंबईत घाटकोपर इथं झालेल्या होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी शिवेसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सुनील शिंदे यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे सरकारचं लक्ष वेधलं. याला सामंत उत्तर देत होते. मुंबई महानगर क्षेत्रातल्या बेकायदा होर्डिंग्जवर तसंच रस्त्याच्या कडेला असलेल्या डिजीटल होर्डिंला चाप लावण्यासाठी पुन्हा ३० दिवसांच्या आत सर्वेक्षण करून दक्षता पथकं नेमून कारवाई केली जाईल, असं सांगत सामंत यांनी सभागृहाला आश्वस्त केलं.
शाळा सुरु होऊन १५ दिवस होऊन गेले तरी ४५ लाख विद्यार्थी गणवेशाविना असल्याचा आरोप विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधानपरिषदेत केला. सरकारच्या एक राज्य एक गणवेश धोरणामुळे खासगी कंत्राटदाराला लाभ मिळाल्याचं दानवे म्हणाले. यावेळी दानवे यांनी शेंद्रा बीडकीन औद्योगिक पट्ट्यात जागतिक दर्जाच्या औद्योगिक सुविधा मिळत नसल्याचा प्रश्न लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. त्याला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं. गेल्या तीन वर्षांत दाओस इथं केलेले सामंजस्य करार आणि या करारांच्या अंमलबजावणीची वस्तुस्थिती मांडणारी श्वेतपत्रिका राज्य सरकार काढेल अशी घोषणा त्यांनी केली.