डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अरबी समुद्रात असना चक्रीवादळाची चाहूल

अरबी समुद्रात ईशान्येकडे ‘असना’ हे चक्रीवादळ तयार होत आहे, सध्या निर्माण झालेलं कमी दाबाचे क्षेत्र गुजरातच्या पश्चिम-नैऋत्य दिशेला दाखल झालं असून, येत्या १२ तासांमध्ये त्याचं चक्रीवादळात रूपांतर होईल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवली आहे. मान्सूनमध्ये चक्रीवादळ तयार होणं ही दुर्मीळ बाब असून, याआधी १९६४ साली ऑगस्ट महिन्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झालं होतं.
सुरुवातीला हे चक्रीवादळ पश्चिम-नैऋत्येकडे आणि त्यानंतर कच्छ किनाऱ्याकडे सरकेल. कच्छच्या किनाऱ्यावरून हे चक्रीवादळ ईशान्य अरबी समुद्रात पाकिस्तानच्या दिशेनं सरकेल अशी शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.

 

सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरात मध्ये ताशी ४५ ते ६५ किलोमीटर वेगानं, तर किनारपट्टीच्या भागात ताशी ६५ ते ७५ किलोमीटर वेगानं वारे वाहतील, गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहील, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

 

कच्छ जिल्ह्यातल्या मांडवी, अब्दासा आणि लखपत तालुक्ंयाना या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसू शकतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षित स्थलांतर करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
सध्या कच्छ जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे, तर किनारपट्टी क्षेत्रात जोरदार वाऱ्यांसह समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी काल आपत्कालीन बैठक घेऊन चक्रीवादळाच्या संभाव्य परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान गुजरातमध्ये कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगरचं क्षेत्र वगळता बहुतांश ठिकाणी इतरत्र गेल्या २४ तासांत पावसाचा जोर कमी झाल्यानं पूर परिस्थिती सुधारत होत आहे, मात्र बचाव कार्य अजूनही सुरू आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा