डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

फेंजल चक्रीवादळामुळे पुद्दुचेरी आणि तामिळनाडूत जनजीवन विस्कळीत/ आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू

फेंजल चक्रीवादळामुळं पुद्दुचेरी आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूर आला असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. अतिवृष्टीमुळे तामिळनाडूत तिरुवन्नामलाई इथं दरड कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. पुरामुळं पुद्दुचेरीमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे, तर तामिळनाडूमध्ये पावसामुळं झालेल्या दुर्घटनांमधे मरण पावलेल्यांची संख्या आता २० झाली आहे.
पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन.रंगासामी यांनी मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचं अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. मदत आणि बचावकार्य सुरू असून, पुरात अडकलेल्या ५५१ जणांना सुखरुप बाहेर काढून त्यांना मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आलं आहे. पुद्दुचेरी, कराईकल आणि यानाममध्ये दहा हजार हेक्टरवरची पिकं नष्ट झाली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं हेक्टरी ३० हजार रुपये मदत जाहीर केली आहे. पशुधन आणि मालमत्तेच्या नुकसानाचीही भरपाई दिली जाईल, असं सरकारनं म्हटलं आहे. राज्यसरकारनं १०० कोटी रुपयांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल केंद्र सरकारला पाठवला असून, आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
फेंजल चक्रीवादळ अरबी समुद्राकडं सरकत असून, तामिळनाडूत अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे. तिरुवन्नमलाई आणि विल्लुपुरममध्ये पावसाचा जोर कायम असल्यानं तिथं पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केंद्रसरकारकडं दोन हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रसरकारनं पथक पाठवावं अशीही मागणी त्यांनी केली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा