दाना-चक्रीवादळाचा फटका बसलेल्या ओडिशातल्या केंद्रपारा, भद्रक, बालासोर आणि जगतसिंगपूर जिल्ह्यांमधली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या चक्रीवादळामुळे मानवी जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. या भागातल्या हजारो हेक्टर भातशेतीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामुळे अनेक भागात वीज तारा तुटल्या असून मोठमोठी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले आहेत.
एनडीआरएफ, ओडीआरएएफ, अग्निशमन सेवा, ऊर्जा आणि इतर विभागांचे कर्मचारी रस्ते आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी चोवीस तास काम करत आहेत. मुख्यमंत्री मोहन चरण माझी भुवनेश्वरमधल्या चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सरकारने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसांच्या सुट्याही रद्द केल्या आहेत.