दाना चक्रीवादळ ओदिशाच्या किनारपट्टीवरील केंद्रपाडा, भद्रक आणि बालासोर इथं धडकल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं. त्यामुळे किनारपट्टीवरील भितर कनिका राष्ट्रीय उद्यान आणि धामरा दरम्यान जोरदार वारे आणि पाऊस झाला. या भागात मोठ्या प्रमाणात झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले असून अनेक घरं आणि भातपिकांचं नुकसान झालं आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. येत्या ४ तासांत चक्रीवादळ कमकुवत होऊन खोल दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होईल आणि उत्तर ओडिशा ओलांडेल असं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी आज सकाळी चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीचा तसंच मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला. दरम्यान, बालासोर, भद्रक आणि मयूरभंज जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट तर केंद्रपाडा, क्योंझर, ढेंकनाल, कटक आणि जाजपूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे.
Site Admin | October 25, 2024 5:12 PM | Cyclone 'Dana' | Odisha