चक्रीवादळ ‘आस्ना’ पुढल्या चोवीस तासात अरबी समुद्रावरुन वायव्य आणि इशान्येच्या दिशेने सरकेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. या चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुजरातमध्ये गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडला.
अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओदिसा, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकची किनारपट्टी तसंच यानम पुदुचेरी इथं दोन दिवसात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढच्या सहा दिवसात राज्यात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्यभारत, केरळ, माहे पुद्दुचेरी इथंही पुढच्या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशाचा पूर्व भाग तसंच अंदमान निकोबार बेटं, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल उत्तराखंड तसंच राजस्थानचा पूर्व भाग इथं मात्र हलका ते मध्यम पाऊस पडेल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आंध्र प्रदेशात मात्र काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक शहरांमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
दरम्यान, गुजरातमधली पूरपरिस्थिती आता आटोक्यात आली आहे. कच्छ आणि सौराष्ट्र या प्रदेशातले काही भाग वगळता गुजरातच्या अन्य भागात गेल्या चोवीस तासात पावसाचं प्रमाण बरंच कमी झालं आहे.