रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत सुरु झालेल्या मेघालयाविरुद्धच्या सामन्यावर मुंबईनं पहिल्याच दिवशी मजबूत पकड घेतली आहे. मुंबईनं नाणेफेक जिंकून मेघालयाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं, आणि ८६ धावात त्यांचा पहिला डाव गुंडाळला. शार्दुल ठाकुरनं ४, मोहित अवस्थीनं ३, सिल्वेस्टर डिसुझानं २, तर शम्स मुलाणीनं १ गडी बाद केला.
त्यानंतर, मुंबईनं पहिल्या डावात दिवसअखेर २ बाद २१३ धावा करत १२७ धावांची आघाडी घेतली. आजचा खेळ थांबला तेव्हा सिद्धेश लाड ८९, तर कर्णधार अजिंक्य राहणे ८३ धावांवर खेळत होता.
सोलापूर इथं महाराष्ट्र आणि त्रिपुरा यांच्यातला सामना आज सुरु झाला. त्रिपुरानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिवसअखेर ५ बाद २३० धावा केल्या. आजचा खेळ थांबला तेव्हा श्रीनिवास शरत् ६६, तर रजत डे १८ धावांवर खेळत होता. महाराष्ट्रातर्फे हितेश वाळूंजनं ३ गडी बाद केले.