रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई आणि विदर्भ यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबई पराभवाच्या छायेत आहे. या सामन्यात विजयासाठी ४०६ धावांचा पाठलाग करताना, दुसऱ्या डावात मुंबईच्या ६ बाद २१० धावा झाल्या होत्या.
आज सामन्याच्या पाचव्या दिवशी मुंबईनं आपला दुसरा डाव कालच्या ३ बाद ८३ या धावसंख्येवरून पुढे सुरू केला मात्र शिवम दुबे, सुर्यकुमार यादव आणि आणि आकाश आनंद हे मुंबईचे फलंदाज झटपट माघारी परतले. त्यानंतर शम्स मुलानी आणि शार्दुल ठाकूर यांनी अर्धशतकी खेळी करत मुंबईचा डाव सावरला.
मुंबईनं हा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं तरी विदर्भानं पहिल्या डावात आघाडी मिळवल्यानं ते अंतिम फेरीत जाऊ शकणार आहेत.दरम्यान अहमदाबाद इथं गुजरात आणि केरळ यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात आज पाचव्या दिवशी केरळनं गुजरातवर पहिल्या डावात २ धावांची नाममात्र पण महत्वाची आघाडी मिळवली. या सामन्यात केरळनं पहिल्या डावात सर्वबाद ४५७ धावा केल्या होत्या.
त्यानंतर त्यांनी गुजरतचा पहिला डाव ४५५ धावांत रोखला. आज सामन्याचा अखेरचा दिवस असल्यानं, हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता आहे, मात्र पहिल्या डावातील दोन धावांच्या महत्वाच्या आघाडीच्या जोरावर केरळचा अंतिम फेरीत पोहचण्याचा मार्ग सुकर झाला आहे.