काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज नागपूर इथं संविधान संमेलनात सहभागी झाले होते. संविधान हे केवळ एक पुस्तक नसून, जीवन जगण्याचं माध्यम आणि तत्वज्ञान आहे, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विकास, प्रगती, अर्थव्यवस्था अशा शब्दांच्या आडून राज्यघटनेवर हल्ला करतात, असा आरोप त्यांनी केला. जाती आधारित जनगणना हा लोकांचा आवाज असून, तो संसदेपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. तत्पूर्वी त्यांनी, नागपूर इथल्या दीक्षाभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. याप्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते.
राहुल गांधी यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुल इथं प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेलाही ते संबोधित करतील.
प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते चंद्रकांत हंडोरे यांची नेमणूक झाली आहे.