अणुऊर्जेमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी देशानं सातत्यानं प्रयत्न केल्याचं सरकारनं आज राज्यसभेत सांगितलं. भारतानं अणु आणि संबंधित इंधन तंत्रज्ञानात सर्वसमावेशक क्षमता प्राप्त केली असल्याचं राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात म्हटलं आहे. सध्याची अणुऊर्जा क्षमता ८ हजार १८० मेगावॅट वरुन २०३१-३२ पर्यंत २२ हजार ४८० मेगावॅट पर्यंत वाढणार असल्याचं ते म्हणाले.
कांदा आणि बटाट्याच्या दर वाढीवरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. शेतमालाला हमीभाव देण्यासाठी कायदेशीर तरतुदीची मागणी खासदारांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन, राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार झा, काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.