कोकणात सापडलेली खनिजं आणि नैसर्गिक साधनसंपत्ती उद्योगपतींना देण्याचा सरकारचा मानस आहे. उद्योगपतींना लूट करता यावी यासाठी इथलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं कारस्थान सत्ताधाऱ्यांकडूनच केलं जात आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ते आज रत्नागिरीत, पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोकणातल्या सामाजिक वातावरणाचे पडसाद मुंबईत उमटतात असं सांगून ‘रत्नागिरी-सिंधुदुर्गात कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचं भाजपचं काम सुरू आहे’, असा आरोप त्यांनी केला. ‘औरंगजेब हा क्रूर शासक होता. त्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रश्नच नाही; मात्र त्याला महाराष्ट्राच्या मातीत गाडलं असल्याची निशाणी म्हणजे त्याची कबर आहे. ती कबर उखडणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या, मराठ्यांच्या शौर्याची निशाणी पुसून टाकण्यासारखं ठरेल.’ अशी भूमिका त्यांनी मांडली.
उद्योगपतींना थेट समुद्रकिनाऱ्याशी जोडण्यासाठी आणि बंदरातून सगळ्या भारताला त्यांना लुटता यावं, याकरता शक्तिपीठ मार्गाचा घाट घातला गेला आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला.