लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धमकी दिल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज राज्यभरात आंदोलन केलं. मुंबईत मीरा भाईंदर इथं काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं. राहुल गांधी यांना धमकी देणाऱ्यांना भाजपाने आवर घालावा तसंच शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं निलंबन करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली.
कुलाबा इथं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवासस्थानासमोर खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. नागपूरमध्ये माजी मंत्री विलास मुत्तेमवार, आमदार विकास ठाकरे, अभिजीत वंजारी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. पुणे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर इथंही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.