केंद्र सरकारनं जातीवर आधारित जनगणना करून आरक्षणावरची ५० टक्के मर्यादा हटवावी असं काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. त्या आज शिर्डीत साकोरी इथं प्रचारसभेत बोलत होत्या. गेली १० वर्ष केंद्रात सत्तेत असूनही सरकारला लाडक्या बहिणींबाबत आताच का विचार करावासा वाटलं असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रातले उद्योग अन्य राज्यात स्थलांतरित करून राज्यात बेरोजगारी वाढीला लावण्याबाबत केंद्र तसंच राज्य सरकारला स्पष्टीकरण द्यावं लागेल असं त्या म्हणाल्या. या सरकारनं संविधानाचं अवमूल्यन केल्याची टीका प्रियांका गांधी यांनी केली.
कोल्हापुरातल्या महापुरुषांच्या, स्वातंत्र्यसेनानींच्या योगदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं, आताही कोल्हापुरच्या जनतेनं विकासकार्यात सक्रिय सहभागी व्हावं असं प्रियांका गांधी यांनी आज कोल्हापुरात निवडणूक प्रचारसभेत म्हटलं आहे. महिलांना प्रत्येक क्षेत्रात किती संघर्ष करावा लागतो याची आपल्याला जाणीव असून प्रत्येक महिनेला दरमहा तीन हजार रुपये देण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं. सर्वांसाठी वैद्यकीय विमा, शेतकऱ्यांना कर्जमाफी तसंच युवकांना रोजगार अशी आश्वासनं त्यांनी दिली .