राज्यात महाविकास आघाडी मजबूत आहे, ती कुणीही हलवू शकत नाही, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. ते आज सांगली जिल्ह्यातील वांगी इथं माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ या स्मारकाचं लोकार्पण आणि पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभात बोलत होते. राज्यातलं भाजपा युती सरकार गुजरातच्या इशाऱ्यावर काम करत आहे, अशी टीका त्यांनी केली. मालवण राजकोट इथं सिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या मुद्यावरुन त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. ज्येष्ठ नेते शरद पवार, काँगेसचे नेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते.
बँकांचे दरवाजे मोठ्या लोकांप्रमाणे शेतकरी, गरीब कष्टकरी आणि तरुणासाठीही उघडे केले पाहिजेत, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. वीस ते पंचवीस लोकांचं १६ लाख कोटी रुपये कर्ज माफ होत असेल तर गरिबांचं देखील १६ लाख कोटी रुपये माफ केले पाहिजेत, असंही ते म्हणाले.
डॉ. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यातल्या अनेक भागात शिक्षण संस्था सुरु केल्या, त्याबरोबरच दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या पलुस कडेगाव भागाचा कायापालटही केला, असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं..