लोकसभेच्या दोन्ही सदनाच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाला उत्तर देताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. अग्निवीर आणि किमान आधारभूत किंमत या मुद्द्यांवर ते सभागृहाची दिशाभूल करत असल्याचं प्रधानमंत्री यांनी नमूद केलं. राहुल गांधी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीनावर बाहेर आले असून, इतर मागासवर्गीय समाजाचा अपमान केल्याप्रकरणी दोषी आढळले असल्याचं सांगून, काँग्रेस नेत्यावर अनेक बदनामीचे खटले सुरू असल्याचं मोदी म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत लोकांना घटना, आरक्षण या मुद्दयांवर चुकीची माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करण्याविषयी प्रधानमंत्री यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसनं त्यांच्या आर्थिक धोरणांतून अनागोंदी माजवली तसंच जात, धर्म यावर आधारित फुटीचं राजकारण केलं. एखाद्या समुदायावर खोटे आरोप करण्याचे षडयंत्र काँग्रेसकडून रचलं जात असल्याची बाब गंभीर असून, काँग्रेसच्या या संस्कृतीला चोख प्रत्युतर दिलं जाईल असा इशाराही मोदी यांनी यावेळी दिला. काँग्रेसच्या राजवटीत लष्कराकडे बुलेट प्रूफ जॅकेटही नव्हती असा आरोप करत मोदी यांनी काँग्रेस राजवटीतल्या बोफोर्स घोटाळा, पाणबुडी खरेदीतील अनियमितता यांच्याकडे लक्ष वेधले. या सर्व ढिल्या कारभारामुळे सशस्त्र दलांच्या सुधारणेत अडथळा निर्माण झाल्याचं मोदी यांनी नमूद केलं.