काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं आज पहाटे धुळे इथं वार्धक्यानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
रोहिदास पाटील यांनी सन १९७२ मध्ये धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून पहिल्यांदा निवडून येत राजकारणात प्रवेश केला. १९८० मध्ये तत्कालीन कुसुंबा आणि आताच्या धुळे ग्रामीण विधान सभा मतदारसंघात आमदार म्हणून ते निवडून आले आणि त्यानंतर सलग ६ वेळा त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. १९८६ ते १९८८ या कालावधीत ते महसूल राज्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी कृषी आणि फलोत्पादन मंत्री, ग्रामविकास, पाटबंधारे तसंच रोजगार हमी, गृहनिर्माण, संसदीय कार्य अशा विविध खात्यांचं मंत्रीपद भूषवलं. त्यांच्या कारकिर्दीत धुळे जिल्ह्यातले अक्कलपाडा आणि इतर प्रकल्प पूर्ण झाले.
रोहीदास पाटील यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार वर्षा गायकवाड अशा मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे.