सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचं ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याचं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर इथं प्रचारसभेत दिलं. मोदी सरकारनं देशातल्या मूठभर उद्योगपतींची अब्जावधी रुपयांची कर्ज माफ केली, असं ते म्हणाले.
जीएसटीच्या माध्यमातून सरकार जनतेची लूट करत असून बड्या भांडवलदारांना कोट्यवधी रुपयांची सूट दिली जात आहे, अशी टीका गांधी यांनी केली.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास सोयाबीनला सात हजार रुपये हमीभाव तसंच कांद्याला विशेष समिती नेमून योग्य भाव देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलं आहे. ते आज अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे इथं प्रचारसभेत बोलत होते. देशाच्या विकासात काँग्रेसनं अमूल्य योगदान दिलं असून काँग्रेस नेहमीच शेवटच्या घटकाचा सर्वात आधी विचार करते असं ते म्हणाले.
शेतकऱ्यांचं ७० हजार कोटी रुपयांचं कर्ज आम्ही माफ केलं होतं परंतु भाजपा सरकारने २५ अब्जाधीशांचं १६ लाख कोटींचं कर्ज माफ केल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकरी, मजूर, महिला यांना हे पैसे मिळतील असे प्रयत्न आम्ही करणार असून ते कधीही अब्जाधीशांच्या घशात जाऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी अब्जाधीशांसाठी नव्हे तर देशातील गरिबांसाठी काम करायला हवं असं ते म्हणाले.