पॅरिस ऑलिम्पिकच्या कालच्या दिवशी भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा यानं रौप्यपदकावर नाव कोरलं, तर पुरुष हॉकी संघानं कांस्यपदकाला गवसणी घातली. या कामगिरीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचं कौतुक केलं आहे. संपूर्ण देशाला नीरजचा अभिमान आहे आणि त्याच्या कामगिरीमुळे येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा मिळेल, अशा शब्दांत राष्ट्रपतींनी त्याची प्रशंसा केली. नीरजनं नेहमीच त्याची प्रतिभा दाखवून दिली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. त्याच्या कामगिरीमुळे तिरंगा ध्वजाचा मान वाढल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कास्यपदक विजेत्या हॉकी संघाचंही अभिनंदन केलं. भारतीय हॉकीला पुनरुज्जीवित केल्याचं मोठं श्रेय या संघाला जातं, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही संघाचं अभिनंदन केलं. जागतिक मंचावर त्यांनी भारताचं नाव उंचावल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल संघातल्या हॉकीपटूंशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. या संघाच्या सन्मानार्थ प्रत्येक हॉकीपटूला प्रत्येकी १५ लाख रुपये आणि त्यांच्यासोबतच्या चमूला प्रत्येकी साडेसात लाख रुपये देण्याची घोषणा हॉकी इंडियानं केली आहे. लोकसभेतही आज नीरज चोप्रा आणि हॉकी संघाचं अभिनंदन करण्यात आलं. ही ऐतिहासिक कामगिरी अनेक युवांना प्रेरणा देईल, असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे.