कांगो या देशात सुरू असलेला संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं पुढाकार घेत कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत भारतासह अन्य देश सहभागी घेतल्याबद्दल संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेचे प्रमुख जीन पियरे लॅक्रोइक्स यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
कांगो गणराज्यात मार्च २३ मूव्हमेंट आणि एम-२३ गटांनी बंडखोरी करत संघर्ष सुरू केला आहे. बंडखोरांनी गोमासह अन्य काही शहरांवर नियंत्रण मिळवले आहेत. गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेवर बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात शांती सेनेतील तीन सैनिक शहीद झाले होते. यात दक्षिण आफ्रिकेतील दोन तर उरुग्वेच्या एका सैनिकाचा समावेश आहे. भारताचे अकराशे सैनिक आणि १६० पोलिस कर्मचारी या मोहिमेत सहभागी असून ते सर्वजण सुरक्षित आहेत. दरम्यान, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं कांगो इथं बंडखोरांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.