आधुनिक भारताची टप्प्याटप्प्याने उभारणी होत असून, सर्वसमावेशक विकास आणि कायद्याचं राज्य ही संकल्पना देशात मूळ धरू लागली आहे असं प्रतिपादन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी केलं आहे. हीच तत्त्व आणि धोरण केंद्रस्थानी ठेवून सरकार कारभार करत आहे. ते काल जिनिवा इथं भारतीय जनसमुदायाला संबोधित करताना बोलत होते.
सरकार महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देत आहे. जी-20 परिषदेच्या अध्यक्षकाळात याच संकल्पनेवर भर देण्यात आला होता असं ते पुढे म्हणाले. जयशंकर यांनी देशात झालेल्या निवडणुका, त्यांचं नियोजन आणि लोकशाही प्रक्रियेची प्रशंसा केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए सरकारसाठी हा तिसरा कार्यकाळ अतिशय महत्वपूर्ण टप्पा असून, गत काळातील प्रगती, चुका आणि उणीवांचं मूल्यांकन करणं यामुळे शक्य होणार आहे.