येत्या डिसेंबरपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात 1 लाख 50 हजार कोटी रुपयांची कामं सुरू करण्यात येतील अशी माहितीकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात दिली.भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कमिन्स महाविद्यालय, कर्वेनगर इथं जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. याशिवाय पुणे ते सातारा महामार्गाचा नवीन विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करुन कामं करण्यात येतील. मुंबई- बंगळुरू या द्रुतगती महामार्गाचं काम हाती घेण्यात आलं असून पुण्याच्या वर्तुळाकार मार्गाला याचा लाभ होणार आहे असंही गडकरी म्हणाले. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे आदी मान्यवर उपस्थित होते.