देशाच्या अनेक भागात थंडीचा कडाका कायम आहे. हिमाचल प्रदेश,छत्तीसगड, बिहार या राज्यांत अनेक ठिकाणी पारा खाली गेला आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असून सिमला,मनालीच्या पर्वतीय भागांत बर्फवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या ठिकाणच्या मैदानी भागात वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा अंदाज असून इथं यलो अलर्ट दिला आहे. यामुळे या ठिकाणचं तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हिमाचल प्रदेशातही कडाक्याची थंडी असून लाहौल स्पिती जिल्ह्यात ताबो इथं उणे १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पर्वतीय भागांत थंडीचा कडाका अधिक असून मैदानी भागात तुलनेत अधिक नोंदवलं गेलं आहे. छत्तीसगडमध्येही पर्वतीय भागांत थंडीची लाट आहे. बिलासपूर इथं धुक्यामुळे दृश्यमानता अतिशय कमी झाल्यानं वाहतूकीवर परिणाम झाला आहे. पुढील २४ तासांत धुकं अधिक दाट होण्याची शक्यता असून हवामान विभागानं सर्तकतेचा इशारा दिला आहे. उत्तरेतल्या थंडीचा परिणाम बिहारमध्ये दिसत आहे. राज्यातल्या तापमानात मोठी घट झाली आहे. थंडीची लाट आणखी तीन ते चार दिवस राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.