अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकानी हात आखडता घेऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आज मुंबईत राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या १६३ व्या बैठकीत बोलत होते. शेती हे महाराष्ट्राचं बलस्थान आहे. म्हणून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. बँकानीही शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिलं पाहिजे, असं ते म्हणाले.
पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना ‘सिबील स्कोअर’ची सक्ती केली जाऊ नये. राज्यातल्या जिल्हा सहकारी बँका, तसंच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या बळकटीकरणाला प्राधान्य दिलं जावं, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी समितीनं सादर केलेल्या, राज्याच्या सन २०२४-२५ साठीच्या ४१ हजार २८६ कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्याला मान्यता देण्यात आली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री दिलीप वळसे -पाटील या बैठकीला उपस्थित होते.