लोकसभेतले विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधी राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची, आणि इथल्या नागरिकांची बदनामी करतात, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आरक्षण संपवण्याचा मनसुबा राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला आहे. मात्र, शिवसेना आणि महायुतीतले सहकारी पक्ष आरक्षणाच्या बाजूने असून, आम्ही आरक्षण संपवू देणार नाही, असं त्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे.
तर, राहुल गांधी नेहमीच देशविरोधी विधानं करत असतात. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी आणि काँग्रेसनं आरक्षणाच्या मुद्यावरुन खोटा प्रचार केला. मात्र आता खरा चेहरा समोर आला आहे, असं फडनवीस यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी परदेशात भारतीय लोकशाहीची बदनामी करत असल्याची टीका केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही केली आहे.