प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचं स्थान अतिशय महत्त्वाचं असून आपल्या सरकारनं शिक्षकांवरचा भार कमी करण्याचा प्रयत्न केल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या विजेत्या शाळांना त्यांच्या हस्ते आज पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, त्या कार्यक्रमात ते बोलत होते.
शालेय शिक्षणंत्री दीपक केसरकर यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. आपलं सरकार फक्त बोलणारं नाही, तर काम करून दाखवणारं आहे, असं सांगून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह युवा, शेतकरी, वयोवृद्धांसाठी राबवलेल्या योजना, तसंच राज्यात उभारलेल्या विविध पायाभूत सुविधांचा उल्लेख त्यांनी केला.
या समारंभात शासकीय शाळा गटात पुणे विभागातल्या धानोरे इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पहिला, ठाणे जिल्ह्यातल्या एनएमएमसी शाळा क्रमांक ५५, आंबेडकर नगर या शाळेला दुसरा, तर गडचिरोलीतल्या जवाहरलाल नेहरू एन. पी. प्राथमिक शाळेला तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. याशिवाय इतरही शाळांचे मुख्याध्यापक आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.