महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पदाचा राजीनामा दिला. १४ व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यानं शिंदे यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री दादा भुसे, मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पहावं असं राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं. आता नवनिर्वाचित आमदारांची १५ वी विधानसभा गठित करण्याची आणि नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे आता नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहतील.
नवीन सरकारस्थापनेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.