टेंभू विस्तारीत प्रकल्पातल्या, सांगली जिल्ह्यातल्या तीन घटक कामांचं भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झालं. या घटक कामांमध्ये टेंभू विस्तारीत प्रकल्पातल्या टप्पा क्रमांक ६, पळशी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक ५ वितरण व्यवस्था, आणि कामथ गुरूत्व नलिका, यांचा समावेश आहे.
या कामांच्या भूमिपूजनातून काळ्या आईचं पांग फेडण्याचा प्रयत्न केला असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. या योजनेच्या सहाव्या टप्प्याला दिवंगत आमदार अनिल बाबर यांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. त्यानंतर विटा इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात त्यांनी, टेंभू योजनापूर्तीसाठी दिवंगत बाबर यांचं मोलाचं योगदान असल्याचं सांगितलं. कार्यक्रमाला उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे आदि उपस्थित होते.